Friday, July 9, 2010

पावसाळी दिवस

तो एक पावसाळी दिवस होता.शनिवार होता तो.शाळा सकाळची होती.नेहमी प्रमाणे आजही मी शाळेत सायकलवरून जात होते;गाणी गुणगुणत,इकडे-तिकडे पहात की कोणी शाळेची मैत्रीण दिसते का ते..

अशीच टंगळ-मंगळ करीत मी जात होते.आदल्या रात्रीच पाऊस येऊन गेल्यामुळे वातावरण थंड झालं होतं.सगळीकडे धुकं पसरलं होतं.आकाशात ढग होतेच.खूप उकाडा झाल्यावर आपण पाणी पिऊन त्रुप्त होतो तशीच वसुन्धरा पावसाचं पाणी पिऊन त्रुप्त झाली होती.मधेच ढगांमधून सूर्य डोकं वर काढत होता.सगळं वातावरण कसे प्रफ़ुल्लीत, उत्साहीत झालं होतं.तरीदेखील रस्त्यावरची लोकांची ये-जा मात्र कमी झाली होती.त्यामुळे माझी पर्वणीच होती.वाहनांवर लक्ष द्यावं लागत नव्हतं.त्यामुळे मनातल्या विचारांना गती मिळाली..

रात्रीच्या पावसाचं पाणी रस्त्यावर ठिकठिकाणी साचलं होतं.वाहनांची ये-जा बंद असल्याने पाणी स्थीर होतं, आणि त्या पाण्यात निळ्या आकाशाचं, कधी काळ्या-कधी पांढ-या ढगांचं प्रतीबिंब पडत होतं.मधेच सूर्यप्रकाश पाण्याद्वारे सगळीकडे परावर्तीत होत होता. हा पाण्याचा खेळ अतीशय मनमोहक होता. या खेळाने माझ्या मनावर भलताच प्रभाव टाकला होता.

आम्हा मुलांना साचलेल्या पाण्यावरून मुद्दामहून सायकल न्यायला आणि ते पाणी उडवायला भलतीच मजा येते. मीही त्यातलीच एक.त्यामुळे पाण्याच्या तळ्यांमधून मी जात होते.एकदा मात्र माझा नेम चुकला आणि मी तळ्याच्या अगदी कडेने गेले.त्यामुळे पाणी स्थिरच राहिलं आणि एक अद्भूत द्रुष्य मला त्यात दिसलं.ते तळं छोटं असल्याने त्यातलं काही कळ्ण्याच्या आतच माझी सायकल पुढे निघून गेली होती.‘ते’ अद्भूत द्रुष्य बघण्याची मला इच्छा झाली, आणि पुढच्या लांबलचक तळ्यात मधोमध न जाता मी मुद्दामहून कडेनं गेले.त्या अद्भूत द्रुष्याचा भरपूर आनंद लुटला.पण कितीही पाहिलं तरी मन भरत नव्हतं.ते पुन्हा पुन्हा पहावंसं वाटत होतं.म्हणून प्रत्येक तळ्याच्या कडेनच मी जात होते आणि आनंद लुटत होते ते अद्भूत द्रुष्य पाहण्याचा...

पण होतं तरी काय एवढं त्या अद्भूत द्रुष्यात? निळ्या आकाशाचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडत होतं.त्यामुळे नेहमी वर दिसणारं आकाश आज पायाखाली दिसत होतं.अगदी ते- ‘आज मै उपर, आसमाँ नीचे...’ असं झाल्यासारखं मला वाटत होतं.जगातील सर्वोच्च पदावर असलेल्या माणसापेक्षाही कितीतरी उच्च असलेलं आकाश आज मी पायाखाली तुडवल्याचा भास मला होत होता, आणि एका अर्थाने सर्वोच्च झाल्याचं समाधान तिथे मिळत होतं.त्या पाण्याने खरोखर मला लिफ़्टच केलं होतं...